ठाणे : कामे करूनही गेली दोन वर्ष ठेकेदारांची बिले काढण्यात आली नसल्याने शुक्रवारी १०० ते १५० ठेकेदारांनी आंदोलन केले, त्यानंतर,त्या ठेकेदारांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली. जवळपास केलेल्या कामांची ८०० कोटींची बिले थकली असून किमान जुनी थकबाकी तरी मिळावी, अशी मागणी सर्व ठेकेदारांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना केली आहे.आता जर वेळेत बिले निघाली नाही तर जगणे देखील मुश्किल होईल अशी विवंचना ठेकेदाराकडून व्यक्त करण्यात आली आहे.आयुक्त डॉ.शर्मा यांनी जसे पैसे येतील तसे ते टप्प्याटप्प्याने देण्यात येतील असे सांगितले.

      ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या फारशी चांगली नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून बिले काढण्यात येत नाही.केवळ अत्यावश्यक कामांची बिले काढण्यात येत आहेत. ठाणे पालिका क्षेत्रात अनेक महत्वाची कामे ही ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येतात.गेल्या दोन वर्षात या ठेकेदारांनी अनेक कामे पूर्ण केली आहेत मात्र केलेल्या कामांचे बिल अद्याप अदा करण्यात आलेले नाही.कोरोना काळात सर्वच विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने ही बिले अदा करण्यात आलेले माहीत असे पालिका प्रशासनाने म्हणणे आहे.

        थकीत बिले मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वीच ठेकेदारांनी आंदोलन करून काम बंद करण्याचा इशारा दिला होता.मात्र तरीही पालिकेकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.अखेर शुक्रवारी १०० ते १५० ठेकेदारांनी एकत्र येऊन पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेवून त्यांच्याकडे कैफियत मांडली. यासंदर्भात त्यांनी निवेदन देखील दिले आहे.