ठाणे : पावसाळ्या दरवर्षी खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर येतो. घोडबंदर परिसरात तसेच पुलावरील खड्ड्यामुळे अनेक बळी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी घोडबंदर रोडवरील खड्ड्यामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला. महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध आणि खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात बळी गेलेल्या तरूणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ५०० खड्ड्यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठाणे शहरातील घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, वर्तक नगर, माजिवडा, बाळकुम, कोपरी परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दरवषर्षी ठाणे महापालिका कोट्यवधी रूपयांचे टेंडर काढूनही खड्ड्याची परिस्थिती मात्र जैसे थै दिसून येते. ठाण्यातील बहुतेक मुख्य रस्त्यावर तसेच एमएमआरडीएने बांधलेल्या फ्लाय ओव्हर वर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्यामुळे लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री, आयुक्त आणि महापौरांच्या निवास परिसरातील रस्त्यांची दुरावस्था दिसून येते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्याच समोर खड्ड्याची दुरावस्था असतानाही यावर कोणतीच उपाय-योजना केली जात नाही हेच ठाणेकरांचे दुर्देव आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड असून यामुळे नाहक ठाणेकरांचा बळी जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या डागडूजी करता पेव्हर ब्लॉकचा उपयोग करू शकत नसतानाही, आजही महामार्गावरील काही खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा बिनधिक्त उपयोग केला जात आहे.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे प्रदर्शन शुक्रवारी आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले होते. यावेळी देवेंद्र कदम, मनिष सावंत,स्वप्नील गुरव, संतोष कांबळे, आशिष डोळे, कृष्णा शर्मा यांचे सहकार्य लाभले.

…………

ठाणे शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवले गेले नाही तर  या खड्ड्यांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल. आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल.

स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष,  महारष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग