* दुपारी १२ ते ४ अवजड वाहतुकीला बंदी

* जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचे नियमन करा

* ठाण्यात झालेल्या सर्व संबंधित यंत्रणांच्या एकत्र बैठकीत निर्देश

 * ‘महिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या’

ठाणे - अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांची झाडाझडती घेतली. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच शिंदे यांनी दुपारी १२ ते ४ वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले. त्याचप्रमाणे, जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचे नियमन करण्यासाठी नवी मुंबई, पालघर, पडघा याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग लॉट उभारण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. तसेच, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्याची घोषणाही शिंदे यांनी केली.

या टास्क फोर्समध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी ठाणे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचएआय आदी यंत्रणांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. पावसाळ्याआधी रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी दर्जेदार पद्धतीने होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याचे, तसेच पावसाळ्यात खड्डे पडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार या टास्क फोर्सला असतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री शिंदे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेत शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाची पाहणी केली, तसेच कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी, ठाणे कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीण व पालघरचे पोलिस अधीक्षक, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, एनएचएआय, मेट्रो, जेएनपीटी आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

* तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या सीमांवर पार्किंग करा

ठाणे शहराशी संबंधित नसलेली अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या सीमांवर पार्किंगची व्यवस्था करून अवजड वाहनांचे नियमन करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच, शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश ठाणे व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

* ‘महिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या’

डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शनिवारी महिला सुरक्षेसंदर्भातही जिल्ह्यातील सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. डोंबिवलीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेने महिलांच्या छोट्यामोठ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, जेणे करून भविष्यात त्यातून गंभीर स्वरुपाचा गुन्हा होणार नाही. महिलांना, तरुणींना पोलिसांकडे येऊन तक्रार करण्याबाबत विश्वास वाटला पाहिजे, तक्रार करण्यासाठी येणाऱ्या महिलांना उलटसुलट प्रश्न विचारून, त्यांचीच उलटतपासणी करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जन वास्तू, इमारती, बंद कारखाने या भागांत गस्त वाढविण्याचे निर्दशही शिंदे यांनी यावेळी दिले. ठाणे जिल्हयातील पोलिस ठाण्यांमध्ये गस्तीसाठी अधिकची दुचाकी आणि चार चाकी वाहने उपलब्ध करून दिली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.