ठाणे: घरात झाड लावले तर एक युनिट कार्बनडायऑकसाइड कमी होते तर एक युनिट ऑक्सिजन निर्माण होते. त्यामुळे घरात एक तरी झाड लावा असा संदेश देताना, ठाणेकर असलेले आणि ७५ हजार झाडे लावण्याचा अनोखा उपक्रम राबविणारे ट्रीमॅन विजय कट्टी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात तरुणाईला दिला. दरम्यान त्यांनी झाडांचे महत्त्व पटवून दिले. निमित्त होते ते केबीपी महाविद्यालयात 'एनएसएस 'डे' चे.

शुक्रवारी केबीपी महाविद्यालयात एनएसएस डे साजरा करण्यात आला. सुरुवातीला कट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संतोष गावडे, एनएनएस प्रोग्राम ऑफिसर जीवन पाटील उपस्थित होते. कट्टी म्हणाले की, झाड लावल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळत असते. परंतू झाड लावताना त्याची अभ्यासपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कोणत्या झाडाला किती खत, किती पाणी लागते,ते किती, कुठे, कसे लावावे  असे प्रश्न देखील आपल्याला पडले पाहिजेत. झाड हे फक्त देत असते ते कधी घेत नाही आणि याची जाणीव आपल्याला नसल्याने वृक्षतोड वाढली. आज सर्रास वृक्षतोड होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. झाड लावल्यावर ते झाड कसे वाढले, किती वाढले हे देखील बघत चला. झाड लावताना संयम राखणे गरजेचे आहे. प्रत्येक झाडाच्या गरज वेगळ्या असतात. काहींना पाणी लागते तर काहींना नाही. काहींना खत लागते, काही झाडांना खताची आवश्यकता नसते असेही ते म्हणाले. एका झाडापासून ५३ किलो कागद मिळतो. त्यामुळे कागद वाचविला तर झाड वाचेल पर्यायाने आपले पैसेही वाचतील. तसेच, मी काही करू शकलो याचा अभिमानही वाटेल. यावेळी कागद कसा वाचवायचा याचे प्रात्यक्षिक कट्टी यांनी दाखविले. 

घरात झाड लावले तर एक युनिट कार्बनडायऑकसाइड कमी होते तर एक युनिट ऑक्सिजन निर्माण होते. त्यामुळे घरात एक तरी झाड लावा असा संदेश त्यांनी दिला. यावेळी कट्टी यांनी विद्यार्थ्यांना रजनीगंधाचे रोप भेट दिले. कार्यक्रमानंतर स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कट्टी यांचा सन्मान करण्यात आला. गावडे यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले. 

* रिव्हर स्टोनवर स्वातंत्र्य सैनिकांचे चित्र

दरम्यान, स्वातंत्र्य सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रिव्हर स्टोनवर स्वातंत्र्य सैनिकांचे चित्र काढून त्यांची नावे विद्यार्थ्यांना ओळखायला लावली.